Saturday, 7 April 2012


. . . . . . . . तू   पाहिजे  तिथे जा!


जर जायचेच होते आलीस तू कशाला
लावून वेड जीवा जातेस तू कशाला?

नव्हते रमावयाचे जर जीवनात माझ्या
ती स्वप्नभू बिलोरी मज दाविली कशाला?

स्वप्ने किती उराशी जपली फुलापरी मी
तुडवून पायी त्यांना जातेस तू कशाला?

विझवायचाच होता का वन्हीं चेतविला
हृदयास जाळूनिया जातेस तू कशाला?

पाळायचीच नव्हती वचने दिली कशाला
विसरून सर्व शपथा जातेस तू कशाला?

परतून यावयाचा नाही विचार जर का
इच्छा अखेरची ही करुनी ग पूर्ण तू जा

ढकलून आत दे तू खोदून खोल खड्डा
देऊन मूठमाती तू पाहिजे तिथे जा!

- विवेक वाटवे

(माझी स्वरचित कविता. ही कविता हातकणंगले-कोल्हापूर येथून प्रसिध्द झालेल्या  एका नियतकालीकाच्या दिवाळी अंकात काही वर्षांपूर्वी  प्रसिध्द झाली आहे.
सुप्रसिध्द 'कुटुंब रंगलय् काव्यात' चे निर्माते आणि सादरकर्ते प्रा. विसुभाऊ बापट यांच्या यांच्या एका गोवा भेटीत त्यांच्या कविता संग्रहात ही कविता नोंदविण्याची सुवर्णसंधी मला लाभली आहे. मी तो माझा गौरव समजतो.)

No comments:

Post a Comment

Enter Your Comments.